
Palghar Gallery
पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला आहे. ठाणे जिल्ह्यापासून वेगळा होऊन १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर हा स्वतंत्र जिल्हा बनला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पालघर जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ३० लाख आहे. येथे मराठी ही प्रमुख भाषा असून वर्ली, कोकणी, कातकरी अशा आदिवासी बोलीभाषाही बोलल्या जातात. ग्रामीण, आदिवासी आणि नागर लोकसंख्येचा येथे संमिश्र विचार आढळतो. जिल्हा त्याच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीसाठी व सागरी अर्थव्यवस्थेसाठी ओळखला जातो.
पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९,९५,४२८ एवढी आहे. पालघरची शहरी लोकसंख्या 1,435,210 आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 48% शहरी भागात राहतात. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.
पालघर जिल्ह्याचे भौगोलिक स्वरूप विविधतेने भरलेले आहे. पूर्वेला सह्याद्री पर्वतरांग आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. वैतरणा आणि सूर्य या प्रमुख नद्या या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या सीमेला ठाणे, नाशिक आणि गुजरात हे भाग लागून आहेत. पूर्व व ईशान्य दिशेस ठाणे व नाशिक जिल्हा असून, गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा व दादरा व नगर हवेली व उत्तरेकडील दमण व दीव केंद्र शासित प्रदेश हे जिल्हा वसलेले आहे. अरबी समुद्राची पश्चिम सीमा बनते, तर वसई-विरार, पालघर-बोईसर, डहाणू हे मुंबई महानगर प्रदेशाचे भाग आहे.
इतिहास
पालघर जिल्ह्याचा इतिहास समृद्ध आणि संस्कृतीने भरलेला आहे. येथे अनेक आदिवासी जमाती पूर्वीपासून वास्तव्य करत आहेत. विशेषतः वर्ली जमात, जी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वर्ली चित्रकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. १९४२ च्या चळवळीच्या काळात पालघरने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पालघर उठाव ही ऐतिहासिक घटना 'भारत छोडो' आंदोलनात घडली. रामचंद्र छिंदमण धेरे, गोविंद ठाकूर, वासुदेव घाग, रामजी गावित हे आदिवासी युवक हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात हुतात्मा स्मारक उभारले आहे.
भूगोल आणि हवामान
पालघर जिल्ह्यात डोंगराळ, जंगले, सागरी मैदान आणि शेती क्षेत्र यांचा समावेश आहे. येथील हवामान मुख्यत्वे दमट असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान असते. सरासरी वार्षिक पाऊस २५०० मिमी इतका आहे. उन्हाळ्यात तापमान ३८°C पर्यंत जाऊ शकते, तर हिवाळ्यात १५°C पर्यंत खाली येते.
अर्थव्यवस्था
पालघर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, मासेमारी, मीठ निर्मिती आणि औद्योगिक क्षेत्रावर आधारलेली आहे. येथे तांदूळ, चिकू, नारळ, आणि भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. दहाणू, वसई, पालघर हे किनारपट्टी भाग बागायती शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. बोईसर येथील तारापूर MIDC ही महाराष्ट्रातील एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे वस्त्रोद्योग, रसायन, स्टील, औषधनिर्मिती कंपन्या आहेत. तारापूर अणुऊर्जा केंद्र (TAPS) हे भारतातील पहिले वाणिज्यिक अणुऊर्जा प्रकल्प आहे. मासेमारी हे किनारी भागात (वसई, दहाणू, केळवा) लोकांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. तसेच वसई आणि पालघर भागात मीठ साठवण्याचे आणि निर्मितीचे उद्योग चालतात.
पर्यटन स्थळे
पालघर जिल्हा निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, आदिवासी कला आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.
केळवा बीच – स्वच्छ किनारा आणि केळवा किल्ल्यामुळे प्रसिद्ध.
महिम बीच – सूर्यास्ताचे सुंदर दृश्य.
अर्नाळा किल्ला – विरारच्या किनाऱ्यालगत बेटावर असलेला किल्ला.
दहाणू – स्वच्छ किनारे व चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध.
अशेरीगड किल्ला – मनोरजवळ डोंगरावर असलेला ऐतिहासिक किल्ला.
कळदुर्ग किल्ला – ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध.
तुंगारेश्वर अभयारण्य – वसई-विरारजवळ जंगल, मंदिरे आणि ट्रेकिंगसाठी उपयुक्त.
वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे – औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात.
भाटाणे धबधबा – पावसाळी पर्यटनस्थळ.